पर्रिकरांनंतर अमित शहांनीही साधला राहुल गांधींवर निशाणा

पणजी : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. तेव्हा ही राजकीय भेट नव्हती, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर राहुल गांधी यांनी जाहीर सभेत धक्कादायक खुलासे केले. पर्रिकरांनी आपल्याला राफेल व्यवहाराबाबत सांगितलं आहे, असा दावा राहुल गांधींनी केला होता. त्यावर मनोहर पर्रिकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पर्रिकरांनी पत्र लिहून राहुल गांधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही कल्पना न देता तुम्ही मला भेटलात. त्यावर मी आपला सन्मान केला. पण ही माझी चूक होती का? आपल्या पाच मिनिटांच्या संवादात आपण राफेल व्यवहाराविषयी एक शब्दही बोललो नाहीत. कृपया या भेटीचा राजकीय फायद्यासाठी वापर करु नका, अशी विनंती पर्रिकरांनी केली आहे. तसंच आपण भेटीनंतर काय दावे केले आहेत हे मला बातम्यांमधून समजलं पण राफेल हा शब्दही आपल्या भेटीत निघाला नव्हता. मी एका जीवघेण्या आजाराशी लढतोय. त्यातही गोव्याच्या जनतेची सेवा करतोय. सौजन्या दाखवण्यासाठी घेतलेल्या या भेटीचा तुम्ही जो राजकीय वापर केलाय, त्याने मला दुःख झालंय. कृपया यापुढे तुम्ही असं करणार नाही, याची अपेक्षा करतो, असंही पर्रिकरांनी म्हटले.

पर्रिकरांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. जीवघेण्या आजाराशी लढत असलेल्या व्यक्तीच्या नावाचा वापर करुन तुम्ही किती असंवेदनशील आहात ते दाखवून दिलंय. पर्रिकरांनी तुमच्या आरोपांबाबत योग्य ते स्पष्टीकरण दिलंय, असं ट्वीट अमित शाहांनी केलं.

दरम्यान, मी काल तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना भेटलो. पर्रिकर यांनी स्वतः सांगितलं की राफेल डील बदलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला साधं विचारलंही नव्हतं, असा खळबळजनक दावा राहुल गांधींनी केला होता.

…तर रोज एक पंतप्रधान आणि रविवारी देश सुट्टीवर असेल : अमित शहा
मंदिर वही बनायेंगे; २१ फेब्रुवारीपासून निर्माणकार्याला सुरुवात करणार : धर्मसंसद