पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – आपसातील वादाच्या तक्रारी करण्यासाठी दोघांत पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी सुरू झाली. तोफखाना पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

विजय पंढरीनाथ वाखारे, राजेंद्र वाल्मीक महाजन (दोघे राहणार मोरया पार्क, बोल्हेगाव, नगर) ही गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, वाखारे व महाजन हे आपसातील वादाच्या तक्रारीसाठी रात्री साडेअकरा वाजता तोफखाना पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाण्याच्या आवारातच त्यांनी हाणामारी सुरू केली. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून दोघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी सचिन सुद्रिक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केलेल्या विजय वाखारे व राजेंद्र महाजन या दोघांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष शिंदे हे करीत आहेत. पोलीस ठाण्यासमोरच हाणामारीच्या घटनेमुळे ही घटना चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.