रावसाहेब दानवेंमुळे भाजपमध्ये गुंडांचा प्रवेश : आ. गोटे यांचे आमदारांना खुले पत्र

धुळे : पोलीसनामा आॅनलाइन – नामचीन गुंडांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्षात प्रवेश देतात. शिवाय, पक्षाची मते वाढवण्यासाठी गुंडांना प्रवेश दिला, असे म्हणतात. भाजपचे केवळ सत्तेसाठी होत असलेले हे अध:पतन मन अस्वस्थ करणारे आहे. गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती. ते हयात असते, तर तुम्ही असे धाडस केले असते का, असा प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी भाजप आमादारांना लिहिलेल्या खुल्या पत्रात विचारला आहे. थेट प्रदेशाध्यक्षांनाच आ. गोटे यांनी लक्ष्य केल्याने भजापमध्ये खळबळ उडाली आहे.
आ. गोटे यांनी स्वपक्षातील आमदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हे अध:पतन आपणा सर्वाना वेगाने विनाशाकडे घेऊन जात आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. अधिवेशन काळात पक्षाचे अनेक ज्येष्ठ आमदार भेटतात, तेव्हा त्यांच्या मतदारसंघातील निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेतृत्वाकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याबद्दल सांगतात. २०१४ च्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या आग्रहास्तव आपण भाजपकडून उमेदवारी केली. त्या वेळी भाजपच्या बहुतांश स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष देवरे यांचे काम केले. ते सुद्धा संरक्षण राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून केले होते. डॉ. सुभाष भामरेंनी अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पक्षाच्या फलकांवर माझा फोटो लावणे बंद केले आहे.

पक्षासाठी कष्ट उपसूनही माझी अवहेलना : अनिल गोटे

राजकीय जीवनात ज्यांनी आपणास प्रचंड विरोध केला, अशा गुंड, बदमाश, वाळूमाफिया, रॉकेलमाफिया, आदिवासींच्या जमिनी बळकावणाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे स्वत: पक्षात प्रवेश देतात. मतांची वाढ करण्याकरिता आम्ही गुंडांना प्रवेश दिला, असे म्हणतात, याबद्दल आश्चर्य वाटते. आज माझ्यावर आलेली वेळ आपल्या मतदारसंघातही येऊ शकते. आपणास जाणीव व्हावी, यासाठी हा पत्रप्रपंच केला आहे, असे आमदार गोटे यांनी पत्रात म्हटले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या या घडामोडी भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या खुल्या पत्रात गोटेंनी आपला आतापर्यंतचा राजकीय इतिहास मांडला आहे.