वाह रे शासन तेरा खेल, जब न्याय मांगा, तब मिली जेल : छगन भुजबळ

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – वसमत येथे राष्ट्रवादीच्या वतीने निर्धार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारने ४ वर्षात जनतेला फसविल्याचे वेगवेगळे किस्से सांगितले. यावेळी बोलताना जेंव्हा न्याय मागितला तेव्हा मात्र, जेलची हवा खावी लागली असे सांगत “वाह रे शासन तेरा खेल जब न्याय माँगा तब मिली जेल” अशा शैलीत भाजप सरकारला टोला लगावला.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मात्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. ते म्हणाले सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार असल्याचे सांगितले. पैसे तर दिलेच नाहीत मात्र जे जवळ होते तेही रांगेत उभे राहून भरून घेतले, अन रांगेतच उभे राहून काढावे लागले. वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे वाहनचालक तंग झाले असून, अजून काही वर्ष हे सरकार राहिले तर नातवाला पेट्रोल एका बॉटलमध्ये आणून दाखवावे लागेल, की याला पेट्रोल म्हणतात. या महागाईने माणूस होरपळून निघाला आहे.

अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे अनेकांचा सभेतून काढता पाय

वसमत येथे गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादीच्यावतीने निर्धार यात्रेची तयारी जय्यत सुरू होती. शहरात दर्शनीय भागात पोस्टरबाजी केली. मात्र, कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नसल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली. अजित पवार न आल्याने अनेकांनी सभेतून काढता पाय घेतला. यामुळे कार्यक्रम संपण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार रामराम वडकूते आदी उपस्थित होते.