‘आरएसएस’च्या लाठीवर बंदी ? ; न्यायालयाची मोहन भागवतांना नोटीस

नागपूर : पोलीसनामा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या हातातील लाठीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका मोहनिस जबलपुरे यांनी नागपूरमधील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतल्यानंतर अतिरिक्त न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांना नोटीस बजावली आहे.

पथसंचलनात स्वयंसेवकांनी हातात लाठी घेऊन सामील होणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

सुरुवातीला जबलपुरेंनी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, तिथे याचिका फेटाळण्यात आली. शेवटी या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने सरसंघचालकांना नोटीस बजावली आहे.

शबरीमाला मंदिरप्रवेश : तृप्ती देसार्इंना अडविण्यासाठी विमानतळाबाहेर विरोधकांची गर्दी 

मोहनिस जबलपुरे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, सरसंघचालक मोहन भागवत आणि अनिल भोकरे यांनी स्वयंसेवकांना लाठी घेऊन पथसंचलनात सामील होण्याचे निर्देश दिले. मात्र, हा प्रकार म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे. याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत पोलिसांकडूनही माहिती मागवली होती. पोलिसांनी पथसंचलनाला परवानगी देताना काही अटी ठेवल्या होत्या. यात पथसंचलनात लाठीचे प्रदर्शन करु नये किंवा बाळगू नये. तसेच याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, अशी माहिती याचिकाकर्त्यांनी याचिकेत दिली आहे.

याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी पोलिसांकडेही धाव घेतली होती. पुरावे म्हणून छायाचित्रही दिले होते, मात्र, पोलिसांनी संघाशी संबंधितांवर कारवाई केली नाही, असेही याचिकेत नमूद केले आहे.