आगामी निवडणुकीत आमची ताकद दाखवू : धनगर समाजाचा इशारा

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजप सरकारने निकाली काढला नाही. या अन्यायाला लाथाडण्यासाठी येत्या निवडणुकीत केंद्रासह राज्य सरकारला धनगर समाज आपली ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धनगर समाजाचे अभ्यासक गोपीचंद पडवळ यांनी दिला.

धनगर समाजास आरक्षण देऊन एस.टी. जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाचा एल्गार मेळावा अहमदपूर येथील निजवंतेनगर मैदानावर पार पडला. यावेळी पडवळ बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. यशपाल भिंगे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून धनगर समाजाचे मार्गदर्शक उत्तमराव जानकर, युवानेते केदार बिडगर, सातपुते मामा, माधव निर्मळ, डॉ. शिवाजी धर्मवाड, नीलकंठ गडदे, शिवाजी पायगुट्टे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पडवळ म्हणाले, येत्या पंधारा ते वीस दिवसांत एस. टी.चे प्रमाणपत्र द्यावे, अन्यथा येत्या निवडणुकीत भाजप सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हा अखेरचा लढा असल्याने आगामी काळात राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी उत्तमराव जानकर यांनी जाहीर केले. तसेच समाजातील वंचित घटकांना आणि उपेक्षितांना न्याय मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. राज्यात एकही धनगड जातीची व्यक्ती अस्तित्वात नसताना राज्य शासन धनगड आणि धनगर वेगवेगळे असल्याचे सांगत आहे.

राज्यात एकही धनगड जातीची व्यक्ती नसल्याचा विविध जिल्हाधिकाऱ्यांकडून व तहसीलदार यांच्याकडून आलेला अहवाल प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी यावेळी बोलून दाखविला. तसेच राज्यशासनाच्या यादीवर असलेल्या धनगड समाजाच्या व्यक्तींची माहिती देण्यात यावी, असे जाहीर आव्हान दिले. प्रास्ताविक बालाजी बकरे यांनी केले. तर मेळावा यशस्वी करण्यासाठी अतिश बकरे, राम नरवटे, बालाजी पारेकर आदी समाजबांधवांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यास लातूर, नांदेड, परभणी, बीड, जिल्ह्यांतून आलेल्या समाजबांधवांनी येळकोट-येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत मैदान परिसर दणाणून सोडला होता.

दिवाकर रावतेंना शिवसैनिकांनी विचारला जाब