२ लाखांचे लाच प्रकरण : गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हवालदाराला पुण्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फसवणुकीच्या गुन्ह्यात वारंट न बजावण्यासाठी तसेच खटल्यात मदत करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पुण्यात सापळा रचून नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदाराला अटक केली. रात्री उशिरा ही कारवाई पूर्ण झाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश सदाशिव शिरसाठ (वय ४८, नेमनूक आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण)  आणि पोलीस हवालदार संजीव खंडेराव आहेर ( वय ४८, बक्कल नं. २१५०) अशी त्यांची नावे आहेत.

पुण्यातील एका तक्रारदाराविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात न्यायालयाने प्राक्लेमेशनची (जाहीरनामा) नोटीस काढली आहे. त्याचे वारंट बजावण्यासाठी पोलीस निरीक्षक शिरसाट व हवालदार आहिरे हे गुरुवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर वारंट बजावायचे नसेल तसेच खटल्यात मदत करतो, यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी दुपारी स्वारगेटजवळील मित्र मंडळ चौकाजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेताना पोलीस हवालदार संजीव आहेर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक शिरसाट हे दुसरीकडे थांबले होते. त्यांनी आहेर यांना पैसे घेण्यासाठी पाठविले होते. त्यांचे त्याबाबत तक्रारदाराशी झालेले संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते.

पैश्यासाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका

लाच घेण्यामध्ये त्यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.