पाठिंब्यासाठी सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी केली होती चर्चा : रामदास कदम यांचे वक्तव्य

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठींबा मिळावा, यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगा दिला, असे वक्तव्य शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी केल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.

नगरच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर भाजपाला बाजूला ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला होता, असे कदम यांच्या दाव्यावरून उघड होते. त्रिशंकू निकाल लागलेल्या अहमदनगर महानगपालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र निकालांमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या भाजपाने कुरघोडीच्या राजकारणात आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर आपले महापौर आणि उपमहापौर नगरच्या महानगरपालिकेत बसवले होते.

अहमदनगरमध्ये झालेल्या राजकीय परिस्थितीवर बोलताना पर्यावरणमंत्री कदम म्हणाले की, ‘अहमदनगरमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाविरोधाची भूमिका दुटप्पी आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.’

नगरमध्ये भाजपा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असतानाही तिथे भाजपाचाच महापौर कसा जिंकला, याची आतली गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर सांगितली होती. नगरमध्ये शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी भाजपा तयार होता. स्थानिक पातळीवर बोलणी सुरू होती. सेनेकडून मागणी झाल्यास पाठिंबा असे सूचविले होते. मात्र महापौर निवडीच्या तीन दिवस अगोदरपर्यंत शिवसेनेतून कुणीही आमच्याशी बोलण्यास तयार नव्हते. मात्र पाठिंब्यासाठीचा प्रस्तावही शिवसेनेकडून आला नाही. उलट आम्हीच शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी बोलावे. रामदास कदमांना आम्ही पाठिंबा देतोय म्हणून सांगा, अशी गळ घालण्यात आली होेती, असे फडणवीस म्हणाले होते.