Happy New Year २०१९ : सर्वत्र नववर्षाचे जल्लोषात स्वागत !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह जगभरात नवीन वर्षाचे मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. ३१ डिसेंबरला पब, बार आणि हॉटेल्स रात्रभर सुरु ठेवण्याची परवानगी मिळाल्यामुळे पुणे, मुंबईतील तरूणाईने नववर्षाच्या स्वागताची मजा लुटली. पुणेसह अनेक शहरातील रस्ते रात्री गर्दीने ओसंडून वाहत होते. अलिबाग, मुंबईतील किनारे गर्दीने खचाखच भरले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जगभरात नववर्षाचा उत्साह दिसून आला. प्रशांत महासागरातील टोंगा आयलँड या देशाने सर्वप्रथम नव्या वर्षाचे स्वागत केले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता टोंगा बेटावर नवीन वर्षाचे आगमन झाले. या देशाला किरीबाटी या नावानेही ओळखले जाते. त्यानंतर काही मिनीटांतच तुफान आतषबाजीसह न्यूझीलँडमध्ये नव्या वर्षाचे आगमन झाले. न्यूझीलँड पाठोपाठ ऑस्टड्ढेलियानेही नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. ऑस्टड्ढेलिया नंतर पूर्व आशियातील कोरिया, जपान,चीन या देशांमध्ये आणि त्यानंतर दक्षिण आशियातील नेपाळ,बांग्लादेश आणि भारतात नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

राज्यात बाराचा ठोका पडताच नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. गोव्यातही पर्यटकांनी गर्दी केली होती. पुणे, मुंबईसह सर्वत्र तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. शिर्डीत नविन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. या ठिकाणी तासंतास रांगेत उभे राहत भाविकांनी नविन वर्षात सुख-शांती आणि स्वास्थ्यासाठी साईंनाथाला साकडे घातले. साईबाबा संस्थानने नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरूस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवले होते. मंदिराला आकर्षक विद्यूत रोषणाईही करण्यात आली होती. साईनामाचा जयघोष करत भक्तांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच मिठाई वाटून सरत्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाचे स्वागत करत भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रात्री १२ वाजता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सुरक्षा रक्षकांची एकच तारांबळ उडाली होती.