उद्धव ठाकरे शिवनेरीवर, मातीचा कलश रामजन्मभूमीला नेणार 

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २४ आणि २५ तारखेला अयोध्येला जाणार आहेत. त्याआधी त्यांनी शिवनेरीचा दौरा हाती घेतला आहे. शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी गडावर जोरदार तयारी करण्यात आली होती. ढोल-ताशा आणि तुतारीच्या निनादात उद्धव ठाकरेंचं शिवनेरीवर स्वागत झालं. हेलिकॉप्टरने उद्धव ठाकरे शिवनेरीवर आले होते. चलो अयोध्येचा नारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केला होता. त्यानुसार २५ नोव्हेंबरला चलो अयोध्या असा नारा देत शिवसेनेने राज्यात जोरदार शक्ति प्रदर्शन करत जय्यत तयारी सुरू केली आहे.
अयोध्या दौऱ्यावेळी २५ नोव्हेंबरला महिला आघाडी आणि युवासेनेनं अयोध्येत येऊ नये, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. महिलांना लक्ष्मणरेषा पाळण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” असा नवा नारा दिला.
‘मी अयोध्येला जाऊन आल्यावर माध्यमांशी बोलेन. निवडणूक समोर आल्याने राम मंदिरचा विषय घेतला, असं बोललं जात आहे. पण मी राजकारण करण्यासाठी जात नाहीये. मी पंचांग पाहून निघालो आहे. अटलजींच्या वेळचं सरकार हे मिला-जुला था, आत्ताचं मजबूत सरकार आहे. हिंदूत गट-तट होऊ नयेत’ अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या.
‘सर्वांनी एकत्र येऊन राम मंदिर अंतिम टप्प्यात नेलं पाहिजे. शिवनेरीवरची ही केवळ माती नाही, शिवभक्तांच्या भावना आहेत. ही माती तिथं पोहचल्यावर खऱ्या अर्थाने मंदिर बांधण्याला चालना मिळणार आहे. तिथे सभा घेणार नाही. साधू-संतांचा आशीर्वाद घ्यायला निघालो आहे. शरयू नदीच्या आरतीत सहभागी होणार. ‘मंदिर वही बनाएंगे’ म्हणत किती दिवस मूर्ख बनवणार आहेत. टीका करणाऱ्या विरोधकांची किती लायकी आहे, माहित आहे’ असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दुसरीकडे, साधू-संतांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचं आमंत्रण केवळ धुडकावलंच नाही तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर राजकीय खेळी केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. “आखाड्याशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्याच नाही तर 25 नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत,” असं आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेचे दिग्गज नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. हा सोहळा जिथे होणार आहे, त्या ठिकाणी शिवसेना नेत्यांनी पूजा केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे आणि विनायक राऊत यासारखे नेते यावेळी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या एका गटानेही उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे.

हजारो शिवसैनिकांच्या आयोध्यावारीचे स्वप्न भंगले