पंतप्रधाननंतर मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

नक्षल विरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी देणारी दोन पत्र प्राप्त झाली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री व त्याच्या परिवाराला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. सदरची पत्र मंत्रालयात प्राप्त झाली आहेत. मागील काही दिवसापासून नक्षलविरोधी मोहिम जोरात सुरू आहे. यामध्ये अनेक नक्षवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. मोठ्याप्रमाणात नक्षलवाद्यांचा होत असणारा खात्मा पाहूण नक्षल चळवळीचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना धमकीचे पत्र पाठवले आहे.

कोणाचेही नाव नसलेले हे पत्र आहे. तुम्ही आमची लोकं मारु शकता परंतू आमचे विचार मारु शकत नाही असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. आम्ही मार्क्सच्या विचाराने प्रभावीत आहोत. या हल्यामध्ये जे पोलीस अधिकारी सहभागी होते त्यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या पत्राची दखल घेत तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपविण्याचा कट रचत असल्याचा संशय आहे. ज्याप्रमाणे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणण्यात आली त्याचप्रमाणे मोदींची हत्या घडवून आणण्याची तयारी माअोवादी करत असल्याचा खळबळजनक खुलासा एका पत्रातून समोर आला आहे. एल्गार परिषदेच्या आयोजनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोमा विल्सन हिच्या घरी हे खळबळजनक पत्र सापडलंय. रोमा विल्सन हिला दिल्लीतून अटक करण्यात आली होती.

याबाबतची माहिती सरकारी वकिलांनी पुणे न्यायालयात दिली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पाच माओवाद्यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पतंप्रधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या रडारवर असल्याचे पत्रातून समोर आलं आहे.