सांगलीतील ‘त्या’ CRPF जवानाचा अपघाती मृत्यू

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४६ जवान शहीद झाले असून ३५ जवान जखमी झाले आहेत. या हल्यात सांगली जिल्हयातील CRPF जवान राहुल कारंडेदेखील शहिद झाल्याचे बोलले जात होते. मात्र, मिळलेल्या माहितीनुसार, राहुल कारंडे यांचा पुलवामा हल्ल्यात नाही, तर पठाणकोट येथे अपघाती मृत्यू झाला. अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली. राहुल कारंंडे हे सांगली जिल्ह्यातील विठुरायाची गावचे होते. दरम्यान, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बुलढाण्यातील नितीन रोठड व संजय राजपूत हे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यामुळे देशांत संतापाची लाट उसळली आहे. तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकव्दारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी जवानांवर भीषण हला चढविला. या हल्ल्यात CRPF चे ४६ जवान शहीद झाले असून ३५ जवान जखमी झाले. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
सुट्टी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबार झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यावर येऊन धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६ व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० कि.मी.वर आहे.
अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या या महामार्गावरून एवढ्या प्रमाणात स्फोटके नेणारा ट्रक निर्वेधपणे कसा काय जाऊ शकला, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.