पोलीस भरती घोटाळ्याचा सूत्रधार प्रविण भटकर पुण्यातील संस्थेत कामाला

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन

मराठवाडयातील नांदेड जिल्हयात पोलिस भरती दरम्यान मोठा घोटाळा झाल्याची धक्‍कादायक माहिती उघडकीस आली असून याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात 2 पोलिस, 13 पोलिस भरतीचे उमेदवारांसह 20 जणांविरूघ्द कट रचुन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या प्रकरणी नांदेड पोलिसांनी बारा जणांना अटक केली आहे. भरती घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार प्रविण भटकर हा एका प्रसिद्ध संगणक तज्ज्ञाचा जवळचा नातेवाईक असून तो ‘ईटीएच’ या संस्थेत कामाला असल्याची माहिती पोलीस दलातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

पोलिस हेड कॉन्स्टेबल नामदेव बाबुराव ढाकणे (आय.आर.बी.), जालना येथील राज्य राखीव पोलिस बलाच्या ग्रुप क्र. 3 मधील पोलिस कर्मचारी शुक्राचार्य बबन टेकाळे, शेखा आगा (रा. रिसोड, जि. वाशिम), शिरीष अवधुद (मे.एस.एस.जी. सॉफ्टवेअर्स,सांगली), स्वप्निल साळुंके (मे.एस.एस.जी. सॉफ्टवेअर्स, सांगली), ओ.एम.आर. ऑपरेटर प्रविण भटकर (रा. पुणे), दिनेश गजभारे (रा. नांदेड. हल्‍ली मुक्‍काम. पुणे), पोलिस भरतीतील उमेदवार ओंकार संजय गुरव (रा. खानापूर, ता. बुदरगड, जि. कोल्हापूर), कृष्ण काशिनाथ जाधव (रा. सावखेडभोई, ता. दे.राजा), शिवाजी श्रीकृष्ण चेके (रा. नारायणखेड, ता. दे.राजा), कैलास काठोडे (रा. सावखेडभोई, ता. दे.राजा), आकाश दिलीप वाघमारे (रा. सावखेडभोई, ता. दे.राजा), सलीम महम्मद शेख (रा. तोंडगांव, ता.जि. वाशिम), समाधान सुखदेव मस्के (रा. गिरवली, ता. दे.राजा), किरण अप्पा मस्के (रा. गिरवली, ता. दे.राजा), सुमित दिनकर शिंदे (रा. येवती, ता. रिसोड, जि. वाशिम), मुखीद मकसूद अब्दूल (रा. जिंतूर, जि. परभणी), हनुमान मदन भिसाडे (रा. रिसोड, जि. वाशिम), रामदास माधवराव भालेराव (रा. भादरपूर, ता. कंधार) आणि संतोष माधवराव तनपुरे (रा. नांदूरा, जि. हिंगोली) यांच्याविरूध्द वजिराबाद पोलिस ठाण्यात गु.र.नं. 89/2018 प्रमाणे भा.दं.वि. कलम 420, 465, 468,471, 120 (ब), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र विठ्ठलराव सहाणे यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी आपआपसात संगणमत करून पोलिस शिपाई भरतीमध्ये उमेदवारांच्या लेखी परिक्षेत स्वतःची अवैधरित्या निवड करून घेण्यासाठी नियोजनबध्द रितीने कट रचला. त्यांनी लेखी परिक्षेतील पेपर जाणीवपुर्वक कोरे सोडले व पेपर तपासणीच्या वेळी ओ.एम.आर. ऑपरेटर्सच्या मार्फतीने रिकाम्या जागी योग्य उत्‍तरे भरून घेवून पैकीच्या पैकी गुण घेतले. आरोपींनी पोलिस दलात भरती होण्यासाठी अयोग्य मार्गाचा वापर करून भरती प्रक्रियेत निवड व्हावी म्हणून खोटे कागदपत्रे तयार केली आणि मुळ कागदपत्रांऐवजी खोटी कागदपत्रे खरी आहेत असे सांगुन शासनाची दिशाभुल केली आहे. हा घोटाळा करण्यासाठी लाखो रूपयांची देवाण-घेवाण झाल्याची माहिती देखील पुढे आली आहे. पोलिस कर्मचारी नामदेव ढाकणे, शुक्राचार्य टेकाळे यांच्यासह सॉफ्टवेअर कंपन्या आणि इतरांनी लाखो रूपयांची माया कमविल्याची धक्‍कादायक माहिती समोर येत आहे. गुन्हयाच्या पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलिस दलातील स्थळानिग गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र विठ्ठलराव सहाणे करीत आहेत. आरोपींविरूध्द दि. 25 एप्रिल रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.