पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे द्वीशतक, १ कोटीची लाच घेताना बडा मासा (तहसीलदार) गळाला

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मुळशीच्या तहसीलदाराला १ कोटीची लाच घेताना रंगेहाथ पकडून आपली २०० वी यशस्वी सापळा कारवाई केली. राज्यामध्ये ८ विभागामार्फत लाचलुचपत विभागाचे काम चालते. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आजची २०० वी कारवाई करुन लाचखोरीत पहिला क्रमांक पटकवून कारवाईचे द्वीशतक पूर्ण केले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज केलेल्या कारवाईत मुळशीचे तहसीलदार सचिन महादेव डोंगरे यांना १ कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

राज्यातील सर्वच सरकारी, निमसरकारी खात्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. नागरिकांचे कोणतेही काम लाच दिल्याशिवाय किंवा घेतल्याशिवाय होत नाही. काही दिवसापू्र्वी भुमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार उघडकीस आला. रोहीत शेंडे या वकिलाला १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, नांदेड असे ८ विभाग आहेत. या वर्षात २९ डिसेंबरपर्यंत ‘एसीबी’ने या आठ विभागांत एकूण ८८१ सापळे लावले. त्यामध्ये तब्बल १ हजार १६६ लाचखोर लोकसेवकांना अटक केली. पुणे विभागात ‘एसीबी’ने यावर्षी सर्वाधिक २०० सापळे लावले. पुणे विभागात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात ‘एसीबी’ने २०० सापळे लावून लाचखोरांना जेरबंद केले.

लाचखोरीमध्ये महसूल विभाग दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टॉपवर आहे. महसूल विभागातील भ्रष्टाचाराची २१४ प्रकरणे उघडकीस आली असून, २६९ जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारतर्फे अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांचे फायदे सर्वसामान्यांना देण्यासाठी लोकसेवकांकडून लाचखोरीचा मार्ग अवलंबिला जातो. १९५ सापळ्यांमध्ये २५८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले. तृतीय स्थानावर पंचायत समिती असून, ९० सापळ्यांमध्ये ११६ लाचखोरांना अटक केली.

१ कोटीची लाच घेताना मुळशीचा तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात