…म्हणून इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बनला चोर

नागपूर : पोलीसनामा आॅनलाइन – बुटीबोरी येथील मुख्य बाजारओळीत चोरी करणारे दोन तरुण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असल्याचे उघड झाले. प्रद्युम्न गुंडेराव वांदिले (२०, काचुरवाही, ता. रामटेक) आणि विशाल मनोज राऊत (२०, सेवादासनगर, आरणी रोड, वाघाडी, जि. यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही तुळशीराम गायकवाड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. ते प्रथम वर्षाला काही विषयांत नापास झाल्याने एका नेटवर्क कंपनीला नोकरी करीत होते.

ही नेटवर्क कंपनी साखळीपद्धतीची असल्यामुळे त्यावर कुणी विश्वास ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीत सदस्यत्वासाठी भरलेले ४० हजार रुपये बुडाले. या प्रकारामुळे बुडालेला पैसा वसूल करण्यासाठी त्यांनी चोरी करण्याची नामी शक्कल लढवली. बुटीबोरी येथे किरायाने राहत असल्याने त्यांनी मुख्य बाजारओळीतील दिवेश एंटरप्राइजेसला आपले लक्ष्य केले.

३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आपला हेतू साध्य केला. नवनियुक्त ठाणेदार आसिफराजा शेख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविले.

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता बुटीबोरीतील चोरी प्रकरण उघडकीस आले. आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींच्या ताब्यातून ३० मोबाइल, एक लॅपटॉप, एक टिड्ढमर असा एकूण एक लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना बुटीबोरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनोज मेश्राम करीत आहेत.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संतोष यापलवार (सिद्धेश्वर सोंडू, जि. चंद्रपूर) हा फरार आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतरच आणखी गुन्हे पुढे येण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आईवडिलांचा आणि भावी जीवनाचा विचार न करता चैनीकरिता गुन्हेगारीकडे वाटचाल करीत असल्याचे भीषण वास्तव या प्रकरणातून समोर आले आहे.