पोलीसाचा खून करणाऱ्याकडून उपनिरीक्षकाला (PSI) जिवे मारण्याची धमकी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – शेवगावच्या पोलिसाचा खून केल्याप्रकरणी नाशिक रोड जेलमध्ये असलेला आरोपी पिन्या कापसे याला न्यायालयीन कामासाठी घेऊन जात असताना त्याने पोलिस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कैदी सुरेश उर्फ पिन्या भरत कापसे (रा.अंतरवली, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. औरंगाबाद न्यायालयाच्या आदेशानुसार कापसेला ताब्यात घेण्यासाठी बीडचे पोलीस गेले होते. कापसे याला पोलीस वाहनात बसवत असताना त्याने पोलीस उपनिरीक्षक जोगदंड यांना त्याच्या वकिलाला फोन करण्यास सांगितले. मात्र जोगदंड यांनी त्यास नकार देताच त्याने त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी मध्यस्थीसाठी धावून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच जोगदंड यांना तुमचे घर पाहिले आहे, मी पाच पन्नास लाख रुपये खर्च करून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच आरडाओरड करत आपल्याला न्यायालयात यायचे नाही तर जेलमध्येच राहायचे आहे, असे सांगत गोंधळ घातला.

याप्रकरणी जोगदंड यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पिन्या कापसे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय गुन्हा केला होता

 

तीन वर्षांपूर्वी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोलते व इतर पोलीस कर्मचारी मुंगी येथे गेले होते. त्यावेळी पिन्या कापसे व त्याचा साथीदार या गावातून जात होते. त्यावेळी कोलते व कापसे यांच्यात झटापट झाला. त्यातून कापसे याने तीक्ष्ण हत्याराने कलते यांचा खून केला होता. त्यामुळे नगर जिल्हा पोलीस हादरले होते.