५ महिला पोलीसांना मारहाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला (Sr.Pi) धमकी

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेने चक्क महिला पोलिसांनाच चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. या महिलेने पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही धमकी दिली. या धक्कादायक प्रकाराने पोलिसांची इभ्रत चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणी आरोपी महिला रेश्मा मलिक हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिला अटक केलेली नाही. गोंधळ घालणाऱ्या रेश्मा मलिकला प्रथम पोलिसांनी मारहाण केल्याचे समजते.

रेश्मा मलिक या महिलेने पाच महिलांना मारहाण करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला धमकी देऊनही तिला अद्याप अटक झाली नसल्याने गृहखात्याकडे संशयाने पाहिले जात आहे.

आंबोली पोलीस मात्र तपास सुरु असल्याचे सांगत आहेत. या सर्व प्रकारामुळे विविध शंका आणि संशय व्यक्त केले जात आहेत. आरोपी रेश्मा मलिकने आंबोली पोलीस ठाण्यात एक लेखी तक्रार केली होती. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ती आली होती. पोलीस ठाण्यात आलेल्या आरोपी रेश्मा मलिकला वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांना भेटायचे होते. त्यावेळी पोलीस ठाण्यात दिवसपाळीत कर्तव्यावर असलेल्या सावनी सुबोध शिगवण यांच्यासह पोलीस निरीक्षक सरगर, महिला पोलीस शिपाई ज्योती पाडेकर उपस्थित होत्या.

दुपारचे अडीच वाजले होते. वरिष्ठ निरीक्षक भारत गायकवाड यांच्याकडे जाऊन रेश्मा मलिकने अर्ज दाखवीत विचारणा केली. मात्र काहीच कारवाई झाली नसल्याचे लक्षात येताच ती भडकली. तिने तुम्ही सगळे चोर आहात, तुम्ही गुन्हेगारांना पाळता, तुमच्यामुळे माझी प्रकृती बिघडली आहे. मी कुणालाही सोडणार नाही अशी धमकी दिली.

त्यावेळी उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी यांनी महिलेला शांत राहण्याचा सल्ला दिला. तर रेश्मा मलिक हिला पोलीस शिपाई ज्योती यांनी बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त महिलेने पोलीस ठाण्यातच पोलिसांच्या आया-बहिणींचा उद्धार केला. तेव्हा महिला पोलीस शिपाई ज्योती यांनी तिला बाहेर नेले असता ज्योतीला आरोपी रेश्मा मलिक हिने मारहाण केली. महिला शिपाई ज्योतीने रेश्माच्या कानाखाली मारली. हा प्रकार पाहून अन्य तीन महिला पोलीस शिपाई फापाळे, वाघमारे, आणि बच्छाव यांनी महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर आरोपी महिलेने मात्र महिला पोलीस शिपाई वाघमारे यांचे केस पकडले आणि पोटावर लाथा मारल्या, वाघमारे यांच्या मदतीला धावून आलेल्या बच्छाव यांनाही मारहाण केली. त्यानंतर अन्य एका महिला पोलिसालाही मारहाण करून शिवीगाळी केली.

उपस्थित सर्वांनीच महिलेला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र ती एेकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. एवढ्यावरच ती थांबली नाही तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांना अश्लील शिवीगाळी केली. आणि बघून घेईन अशी धमकी दिली. आरोपी रेश्मा मलिक हिला पोलिसांनी कूपर रुग्णालयात नेले, तिथेही मलिकने गोंधळ घातला. रेश्मा मलिकविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात मारामारी आणि शिवीगाळी तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एकुणच हा प्रकार संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

चिरीमिरी घेणाऱ्या २ पोलीसांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई