भाजपचा घोडेबाजार फळाला ; नगरच्या महापौर पदी भाजपचे बाबासाहेब वाकळे विजयी 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन  – उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर महानगरपालिकेची महापौर पदाची निवडणूक आज पार पडली असून यात घोडेबाजाराच्या बळावर महापौर पद बळकावण्यात भाजप यशस्वी झाले आहे. त्रिशंकू निकालात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपला महापौर पदाचा विडा जिंकण्यात यश आले आहे. भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांनी या निवडणुकीत शिवसेच्या बाळासाहेब बोराटे यांना मात देत महापौर पदावर आपले नाव कोरले आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांना मात्र आपण फक्त नावाचेच उमेदवार होत असल्याचे समजताच त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. बारस्कर यांनी अर्ज माघारी घेताच वाळके विरुद्ध बोराटे म्हणजेच भाजप विरुद्ध शिवसेना असा सामाना झाला.

भाजपला नगरच्या जनतेने खासदार दिलीप गांधींच्या नेतृत्वामुळे नाकारल्याची चर्चा निकालानंतर अहमदनगरमध्ये रंगली होती. अहमदनगरच्या जनतेला आपल्या पाठीशी उभा करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यशस्वी ठरले परंतु त्यांना जनतेने सर्वात मोठा पक्ष तर बनवले परंतु बहुमताच्या जवळ सुद्धा नेवून ठेवले नाही. तर या निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम सर्वच पक्षांनी जोरदार राभववल्यानेच नगरची पालिका त्रिशंकू झाली असे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपसात आघाडी केली असली तरी या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादीने मात्र काँग्रेसच्या सोबत आघाडीचे उमेदवार उभा करून आतून मात्र भाजपचा उमेदवार निवडणून आणण्याचा कार्यक्रम कृतीत उतरवला आहे.

अहमदनगर आमदार संग्राम जगताप यांनी या निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली असून राष्ट्रवादीच्या निर्वाचित नगरसेवकांना भाजपच्या वळचणीला घेऊन जाण्याची कामगिरी त्यांनीच पार पाडली आहे. आमदार संग्राम जगताप हे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे जावई आहेत. कर्डीले यांच्या पुढाकाराने संग्राम जगताप यांच्या मध्यस्तीने हि निवडणूक भाजपने जिंकली आहे हे सत्य. आता सूर्य प्रकाशा प्रमाणे स्पष्ट झाले आहे. तसेच भाजपचे महानगरपालिका निवडणुकीचे रणनीतीकार गिरीश महाजन यांना पक्षाने नगरच्या महानगरपालिकेचे महापौर पद जिंकून घेण्यासाठी भल्या सकाळी पाठवून दिले होते. त्यांच्या रणनीतीचा आधार घेत भाजपने शिवसेनेवर मात दिली आहे. वाकळे यांना ३७ मते पडली तर बोराटे यांना २५ मते पडली.

असा झाला महापौर पदाचा निकाल

राष्ट्रवादीच्या उमेदवाराची महागार झाल्याने भाजपचा उमेदवार जिंकण्यास मदतच झाली. भाजप विरुद्ध शिवसेना अशा सामन्यात आज भाजपने बाजी मारली असून भाजपचे बाबासाहेब वाळके यांना ३७ मते तर शिवसेनेच्या बाळासाहेब बोराटे यांना २५मते मिळाली. या निकालाचा अर्थ असा होतो कि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एक गठ्ठा मते हि भाजपच्या उमेदवाराला दिली तर बहुजन समाज पार्टीच्या चार नगरसेवकांना आपलेसे करण्यात भाजपला यश आले आहे. बहुमताचा आकडा ३५ असताना भाजपने अतिरिक्त दोन मते मिळवल्याने शिवसेना आणि काँग्रेस अवाक झाल्याचे चित्र नगरमध्ये पाहण्यास मिळाले.

असे होते नगरच्या पालिकेच्या नगरसेवकांचे संख्याबळ

शिवसेना -२४

भाजप – १४

राष्ट्रवादी – १८

काँग्रेस – ५

बसपा  – ४

समाजवादी पार्टी – १

अपक्ष – २

अहमदनगर महापौर निवडणूक : श्रीपाद छिंदमला सभाग्रहात मारहाण