पाऊसाच्या अपडेटस् : शनिवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

शुक्रवारचा दिवस संपला तरी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे पूर्वपदावर येऊ शकलेली नाही

Updated: Jun 19, 2015, 11:31 PM IST
पाऊसाच्या अपडेटस् : शनिवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर title=

मुंबई : शुक्रवारचा दिवस संपला तरी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे पूर्वपदावर येऊ शकलेली नाहीय. वेस्टर्न रेल्वे रडत-कढत सुरू झाली असली तरी मध्य आणि हार्बर रेल्वे मात्र अजूनही ठप्पच आहे.

तब्बल दहा तासांनी मुंबईत वेस्टर्न रेल्वेवर पहिली लोकल सुटली... आणि मुंबई हळूहळू सावरतेय, अशी आशा निर्माण झाली. पण, पावसाचा जोर मात्र कायम राहिला. माटुंगा रोड आणि एल्फिस्टन इथल्या ट्रॅकवर पुन्हा एकदा पाणी वाढलं आणि थोड्या काळासाठी सुरू झालेल्या पश्चिम रेल्वेनं पुन्हा मान टाकली. रात्री 11 वाजल्याच्या सुमारास मात्र वेस्टर्न रेल्वे पुन्हा हळूहळू सुरू होत असल्याचं सांगण्यात येतंय.

आर्थर रोड तुरुंगातही शिरलं पाणी
सारी मुंबई पावसामुळं तुंबलेली असताना आता मुंबईतल्या आर्थर रोड जेलसुद्धा जलमय झालंय. जेलमध्ये पाणी शिरल्यानं इथल्या कैद्यांचे हाल होत आहेत. जेलच्या ग्राउंड फ्लोअरवर पाणी शिरल्यानं कैद्यांना वरच्या मजल्यावर हलवलं. आर्थर रोड जेलमध्ये कैद्यांची क्षमता ही 800 आहे. मात्र, सध्या इथं 2700 कैदी आहेत. त्यामुळं तुंबलेल्या पाण्यात कैद्यांवर लक्ष ठेवावं कसं असा प्रश्न जेल प्रशासनाला पडलाय.

पोलीसही गेले पाण्यात...
मुंबईतील मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले असताना कायद्याचे रक्षण करणा-या पोलिसांचीही दैना झालीय. मुंबईतल्या कुर्ला परिसरातील नेहरुनगर पोलीस स्टेशनमध्येच पाणी शिरलं. संततधार पावसामुळं मुंबईतल्या इतर भागांप्रमाणे नेहरु नगर पोलीस स्टेशनसुद्धा सकाळपासून जलमय झालं होतं. फिर्याद नोंदवण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही गुडघाभर पाण्यातून जावं लागत होतं.

 

रात्री ९ वाजता

हवामान खात्याने येत्या २४ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविल्यानं उदया म्हणजेच शनिवार २० जून रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काही वेळापूर्वी ही घोषणा केलीय. 

सायंकाळी ७ वाजता
मध्य - हार्बर रेल्वेच्या ट्रॅकवरून पाण्याचा निचरा होत नसल्याने सीएसटीहून निघणारी लोकल सेवा अजूनही ठप्प आहे.

सायंकाळी ६.३० वाजता
दादर, कुर्ला टर्मिनस, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानक परिसरातून जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे आदेश सबंधित महापालिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी आलेले प्रवासी हे सकाळपासून लोकल गाड्या आणि रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने त्या स्थानकात अडकून पडले आहेत.

सायंकाळी ५.३० वाजता
शनिवारीही मुसळधार पावसाची शक्यता... गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आयुक्तांनी केलं आवाहन

सायंकाळी ५.०० वाजता
* शिवसेनेची स्थापना सेवा करण्यासाठीच - उद्धव ठाकरे
* कोसळत्या पावसात वर्धापन दिन साजरा करणे योग्य नाही... शिवसैनिकांना आवाहन करतो वर्धापन दिन साजरा करु नका
* मीठी नदीच्या धोक्याचा पातळी वाढतेय
* दोष देणारे दोषच देणार
* पालिकेला दोष देणं सोपं आहे... पण, मुंबईला एक अधिकार असणारी पालक यंञणा हवी
* मुंबईची भौगोलिक परिस्थितीच तशी आहे... समुद्रातलं पाणी उलटं मुंबईत येतं, ओहोटी येत नाही तोर्यंत तीन गेटपैकी एका गेटात अडकलेला दगड काढता येणार नाही

समुद्रात आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावणेचार मीटर उंच लाटा उसळल्या, समुद्राला भरती असल्याने मुंबईतील खोल भागातील पाण्याचा समुद्रात निचरा होण्यास अडचणी येत आहेत. दरम्यान मुंबईत पावसाने काही वेळ अवकाश घेतला असला तरी काही भागात अधून मधून सरी सुरूच आहेत, उपनगर आणि ठाणे, कल्याण, नवी मुंबईत अजूनही पावसाचा जोर कायम आहे. 04.05 PM

मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट 03.01 PM

मुंबईसाठी खरं आव्हान दुपारी अडीच वाजता येणाऱ्या समुद्राच्या भरतीचं आहे, कारण दुपारी अडीच वाजता ४.४७ मीटरच्या लाटा उसळणार आहेत, म्हणजेच समुद्राला उधाण येणार आहे, तर दुसरीकडे पाऊस सुरूच असल्याने परिस्थिती अधिक भीषण होण्याची शक्यता असल्याने, मुंबईत अलर्ट देण्यात आला आहे. महत्वाच्या कामाशिवाय बाहेर न जाण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. आठ तास उलटूनही अजूनही मुंबईची लाईफ लाईन ठप्पच आहे.  (1.44 PM)

माटुंगा कुर्ली दरम्यान अजूनही ट्रॅकवर पाणी (1.42PM)

शहरात ६३ ठिकाणी पाणी साचलंय, मुंबई विद्यापिठाच्या परिक्षा देखिल पुढे ढकलण्यात आल्याचं, विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे.  (1.40 PM)

मुंबई विमानतळावर येणारी-जाणारी विमानं ३० ते ४५ मिनिटं उशीराने, पावसामुळे १८ उड्डाणं रद्द 1.29 PM

मुख्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागाला भेट, अडीच वाजता येणारी भरती हे आणखी एक आव्हान - सीएम 1.24 PM

मुंबई हायकोर्टाच्या चिफ जस्टिस यांच्याकडून पावसामुळे कोर्टाला सुटी जाहीर, सेशन कोर्टाचंही आज कामकाज बंद 1.21 PM

फरहान अख्तरचं ट्वीट - मला वाटतं मुंबईकरांचा टॅक्सचा पैसा, मुंबईचं ड्रेनेज सिस्टम ब्लॉक करण्यासाठी वापरला जातो - 1.16 PM

फिल्मसिटीतही अनेक ठिकाणी पाणीसाचलं, काही स्टुडिओंमध्ये पाणी शिरल्याने शूटिंग थांबवण्याची वेळ - 1.15 PM

मुसळधार पावसामुळे पाच तासानंतरही मुंबई लोकल ठप्प आहे, पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा ठप्प आहे, २६ जुलै २००५ नंतर पहिल्यांदा मुंबई लोकलवर ही स्थित ओढवली आहे. ( 12.44 PM)

पावसामुळे कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी असल्याने, डबे वाल्यांची सेवा आज बंद ( 11.44 AM)

शक्य असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यास या, स्कूल बस असोसिएशनचं आवाहन, पाणी आणि खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता- स्कूल बस असोसिएशन (11.40 AM)

बेस्टच्या चालकांना कामावार पोहोच्याच्या सूचना ( 11.31 AM)

सुरक्षेच्या कारणास्तव दक्षिण मध्य मुंबईतला वीज पुरवठा ताप्तुरता बंद (11:34 AM)

दक्षिण मुंबईपासून उपनगरांत सकाळपासून धो-धो पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलंय. कुलाब्यात २४ तासात २०४ मिलि मीटर पाऊस झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

काही बेस्ट चालकांना वेळेवर पोहोचता येत नसल्याने, बेस्ट सेवा ही अनियमित झाली आहे, पाणी साचत असल्याने टॅक्सी चालकांनीही 'आगे टॅक्सी नही जायेगा' चा मंत्र सुरू केला आहे.

रेल्वेच्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पावसामुळे ऑफिसला उपस्थिती कमी असल्याने डबे वाल्यांनीही आज सेवा बंद केली आहे. 

महापालिकेने सर्व शाळा बंद ठेवल्या आहेत. आज दुपारी अडीच वाजता हायटाईड असल्याने पाऊस सतत सुरू असल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा अंदाज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.